मुंबई : मुंबई महापालिकेने कोरोना काळात खरेदी केलेल्या डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणी ईडी आता अॅक्शन मोडवर आलेली आहे. कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात ईडीने मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्याशिवाय याच प्रकरणात ईडीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनीही चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणातील कथित घोटाळ््या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सप्टेंबर महिन्यात दोन तास चौकशी केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडीने आयसीआयआर दाखल केले होते. माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) आणि माजी महापालिका उपायुक्त (खरेदी/सीपीडी) आणि इतरांचीदेखील आयसीआयआरमध्ये नावे आहेत. कथित फसवणुकीची रक्कम सुमारे ४९.६३ लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर ईडी चौकशीसाठी काहींना समन्स बजावू शकते. अशी शक्यता वर्तवण्यात आली. अखेर ईडीने आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.