नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शेतक-यांनी पंजाब-हरियाणा सीमेवर दिल्ली चलो आंदोलन सुरूच ठेवले असून शनिवारी आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. रविवारी, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, नित्यानंद राय आणि पीयूष गोयल चौथ्या फेरीच्या चर्चेसाठी शेतकरी नेत्यांची भेट घेतील. मागील ३ फे-या अनिर्णित राहिल्या आहेत. दरम्यान, पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर शंभू आणि खनौरी येथे पिकांच्या किमान आधारभूत किमती आणि इतर मागण्यांसाठी कायदा करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
आंदोलक शेतकरी बॅरिकेडसच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पंजाबच्या शेतक-यांनी १३ फेब्रुवारीला दिल्लीकडे मोर्चा वळवला. मात्र, हरियाणा-पंजाबच्या शंभू आणि खनौरी सीमेवर सुरक्षा कर्मचा-यांनी त्यांना रोखले. तेव्हापासून आंदोलक दोन्ही सीमेवर ठाण मांडून आहेत. आंदोलकांकडे १३ मागण्यांची यादी आहे. ज्यात प्राथमिक किमान आधारभूत किंमतवर कायदेशीर हमी आहे. सरकारचे म्हणणे आहे की, १० मागण्यांवर एकमत झाले आहे. एमएसपी एक हा दोन्ही बाजूंमधील सर्वात मोठा स्टिकिंग पॉईंट आहे. शेतक-यांना राष्ट्रीय राजधानीत निदर्शने करायची आहेत. पण हरियाणा पोलिसांनी त्यांना पंजाब-हरियाणा सीमेवर रोखले आहे.
हरियाणात ट्रॅक्टर मोर्चा
दरम्यान भारतीय किसान युनियन (चारुणी) ने शनिवारी हरियाणात ट्रॅक्टर मोर्चा काढला तर बीकेयूने त्यांच्या विविध मागण्यांसाठी पंजाबच्या सीमेवर आंदोलन करणा-या शेतक-यांच्या समर्थनार्थ भाजपच्या ३ वरिष्ठ नेत्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरले आहेत. दरम्यान, केंद्र सरकार यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी आतापर्यंत ३ फे-या पूर्ण झाल्या आहेत. आता उद्या चर्चेची चौथी फेरी होणार आहे. या बैठकीत तोडगा निघणार का, यावर लक्ष असणार आहे.