नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. तसेच पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती आणि त्याचा फायदा पक्षाला कर्नाटक निवडणुकीत मिळाला. आता अशी बातमी आहे की, ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकतात.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकतात. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. याआधी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी १३ नोव्हेंबरला भोपाळमध्ये पदयात्रा काढणार आहेत. सध्या राहुल गांधी तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर असून त्यांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात राहुल गांधीं बुधवारी (८ नोव्हेंबर) अंबिकापूर, छत्तीसगड येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यानंतर ९ नोव्हेंबरला मध्य प्रदेशातील जबलपूर, १० नोव्हेंबरला सतना आणि १३ नोव्हेंबरला भोपाळमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू केली होती आणि ३० जानेवारी २०२३ रोजी जम्मू-काश्मीरमधून ती संपवली होती. भारत जोडो यात्रा २.० या वर्षी डिसेंबर महिन्यापासून सुरू होऊ शकते आणि पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत चालेल. हा प्रवास मागील प्रवासापेक्षा वेगळा असेल असेही बोलले जात आहे. मागच्या वेळी राहुल गांधींनी पायी प्रवास केला होता, तर यावेळी कुठेतरी पायी तर कुठे वाहनातून प्रवास पूर्ण होणार आहे.