21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेस आणि भाजप बंडखोरीमुळे त्रस्त

काँग्रेस आणि भाजप बंडखोरीमुळे त्रस्त

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यावेळी काँग्रेस बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे तर त्याचवेळी भाजप पुन्हा सत्तेत येण्याबाबत आशावादी आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजप बंडखोरीमुळे त्रस्त झाले आहेत. दोन्ही पक्षांना बंडखोरांचा सामना करावा लागत आहे.

दोन्ही पक्षात तिकीट वाटपाबाबत बंडखोरी सुरूच असून आंदोलन करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. काँग्रेसने अशा सुमारे ३९ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टीही केली तर मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या आणि पक्षश्रेष्ठीपासून दूर गेलेल्या नेत्यांवर भाजपनेही कडक कारवाई केली आहे. भाजपने ३५ नेत्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.

हकालपट्टीनंतरही विरोध सुरूच असून हे बंडखोर नेते निवडणुकीपर्यंत कोणाचा खेळ बिघडवतात का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक जागांवर तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला असून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अलीकडेच काँग्रेसने पक्षविरोधी कारवायांमुळे दोन माजी आमदारांसह ३९ नेत्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. यातील अनेक बंडखोर नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी अर्जही दाखल केले आहेत.

भाजपने छतरपूरमधील मल्हारा येथील करण लोधी, निवारीतील नंदराम कुशवाह, दमोह येथील शिवचरण पटेल, पन्ना येथील गुणौर येथील अनिता बागरी, सतना येथील चित्रकूट येथील सुभाष शर्मा डॉली यांना डावलले आहे. तसेच मध्य प्रदेश काँग्रेस या बंडखोर नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी काँग्रेसला यशही प्राप्त झाले आहे.

काँग्रेससाठी चिंतेची बाब
काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे की, ज्या ३९ नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, त्यात माजी खासदार प्रेमचंद गुड्डू, माजी आमदार अंतर सिंग दरबार, माजी आमदार यादवेंद्र सिंह आणि पक्षाचे माजी प्रवक्ते अजय सिंह यादव अशी काही मोठी नावे आहेत.

राहुल गांधींची पदयात्रा
त्याचबरोबर बंडखोरांकडून अपेक्षित तोटा राष्ट्रीय नेत्यांच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रदेश काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या येथे पक्ष सातत्याने जाहीर सभा आयोजित करत आहे. रिपोर्टनुसार, राहुल गांधी निवडणुकीपूर्वी जबलपूर ते भोपाळदरम्यान पदयात्राही काढू शकतात. यासह मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR