परभणी : विद्यापीठ संशोधनास प्रथम प्राधान्य देते. यातूनच शेतक-यांना महत्त्वपूर्ण शिफारशी आणि तंत्रज्ञान दिले जाते. हे तंत्रज्ञान पश्चिम विभागीय कृषी महामेळाव्याचे आयोजन करून शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यात यश प्राप्त झाले. पावसाचा मोठा खंड पडला तरी तग धरणारे व शाश्वत उत्पादन देणारे वाण विकसित करण्याचे संशोधन हाती घेण्यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांना सुचित केले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि आत्मा, कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्य आयोजन दि.२१, २२, आणि २३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रागंणात करण्यात आले होते. या मेळावाचा समारोप दि.२३ फेब्रुवारी रोजी झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि होते. तर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विस्तार (भारत सरकार) सहसंचालक श्रीपाद खळीकर, कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वरपूडकर, नागपुर येथील विभागीय सेंद्रीय शेती संशोधन केंद्राचे विभागीय संचालक अजय सिंह राजपूत, भारत कुमार देवडा, विजय आगरे, माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संचालक बीजोत्पादन डॉ. देवराव देवसरकर, नियंत्रक प्रवीण निर्मळ, कुलसचिव पि के. काळे,
डीआरडीए प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, उपसंचालक डॉ. गजेंद्र लोंढे, समन्वयक डॉ. राजेश कदम, मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. इंद्र मणि म्हणाले, मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाच्या दालनातून दोन कम्बाईन हार्वेस्टरसह अनेक शेती व गृह उपयोगी वस्तूंची विक्री झाली असल्याचे सांगितले.