मुंबई : प्रतिनिधी
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधा-यांच्या विरोधात रणनीती आखण्याच्या दृष्टीने विरोधकांमध्ये खलबते सुरू आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आजच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. परंतु आगामी रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने त्यांच्यात खलबते झाले असावेत, असे बोलले जात आहे.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दावे-प्रतिदावे करण्यात आले. यात महायुतीलाच चांगले पाठबळ मिळाल्याच्या दावा केला गेला. तसेच कॉंग्रेसनेही महाविकास आघाडीही मागे नसल्याचे सांगितले. त्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीला विशेष महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आगामी निवडणुकीवर महाविकास आघाडीकडून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या स्थापनेबाबतही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे या बैठकीकडे विशेष लक्ष दिले जात होते. परंतु खुद्द आव्हाड यांनी या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अदानींबाबत उद्धव ठाकरेंची काही मते आहेत, त्याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे म्हटले होते. त्यामुळे बैठकीला ही पार्श्वभूमीदेखील असल्याचे बोलले जात होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अदानी यांच्यावर निशाणा साधला होता. धारावी पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाकडे गेले आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अदानी यांच्यातील संबंधावर भाष्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर या चर्चेला विशेष महत्त्व दिले जात होते. मात्र, या प्रमुख नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे उशिरापर्यंत समोर आले नाही.
राजकीय नव्हे, कौटुंबीक भेट
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा. संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला आले, त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या नेत्यांमध्ये ४५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर आव्हाड यांनी आजची बैठक ही कौटुंबिक स्वरुपाची होती. यात राजकीय विषयावर फार चर्चा झाली नाही. राजकीय बैठक नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण नव्हते, असेही आव्हाड म्हणाले.