28.5 C
Latur
Wednesday, October 9, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा व ओबीसी समाजांत तेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न

मराठा व ओबीसी समाजांत तेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा व ओबीसी समाजांत तेढ निर्माण करून राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारकडूनच केले जात आहेत. सरकारमधील दोन मंत्री जाहीरपणे आरक्षणासंदर्भात वेगवेगळी विधाने करीत आहेत. सरकारमध्ये एकवाक्यता नाही त्यामुळे सर्वप्रथम सरकारने आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका सर्वपक्षीय बैठकीत मांडण्यात आली होती; पण राज्याला भेडसावत असलेले महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, ड्रग्जची तस्करी या मूळ मुद्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी वातावरण बिघडवले जात असल्याचा आरोप केला. मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या मतांवर भाजपा सत्तेत आला; पण त्यांना आरक्षण दिलेच नाही.

मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडू नका, असे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले होते, असे त्या वेळी सरकारची बाजू न्यायालयात मांडणारे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनीच सांगितले आहे, असा दावाही पटोले यांनी केला. मागास जातींना आरक्षण दिले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आरक्षण प्रश्नी आज तो वाद सुरू आहे त्यातून मार्ग काढायचा असेल तर जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणे गरजेचे आहे; पण केंद्रातील भाजपा सरकार मात्र यावर निर्णय घेत नाही कारण भाजपा मुळातच आरक्षण विरोधी असल्याची टीका पटोले यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR