बारामती : माझ्या नव-याने भाषण केलेले चालेल का ? संसदेत मी जाणार की माझा नवरा ? नव-याला संसदेत अलाऊड नसते, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावे लागते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना सणसणीत टोला हाणला. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे सुनेत्रा पवारांसाठी मैदानात उतरले आहेत. ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. याच मुद्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना लक्ष केले. पुण्यातील वडगाव येथील सभेत बोलताना त्यांच्या टीकेचा रोख सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडेच होता.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. अजित पवारांनी शरद पवारांचा हात सोडला आणि भाजपची साथ दिली तेव्हापासून दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर टीका करतात, टोलेबाजी करत असतात. त्यातच आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार असा सामान रंगण्याची चिन्हे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. खुद्द अजित पवार हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंंजून काढत आहेत. विविध कार्यक्रमांद्वारे जनतेशी संपर्क साधत आहेत. त्यादरम्यान अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लक्ष्य करत टीका केली होती. त्याच मुद्यावरून प्रत्युत्तर देताना बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर बोचरी टीका केली.
पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी ?
तुम्हाला कसा खासदार पाहिजे ? सदानंद सुळे चालतील का ? (मी) सदानंद सुळे यांना पाठवते, ते भाषण करतील. पण, सदानंद सुळे यांनी कितीही उत्तम भाषण केले तरी पार्लमेंटमध्ये तिथे जाऊन विषय मांडायचे. मलाच लढायचे आहे. माझा नवरा येऊन भाषण करेल ते तुम्हाला चालेल का ? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी जाणार आहे ? नव-याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसते. पर्स सांभाळत कॅन्टीनमध्ये बसावे लागते, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.