पुणे : ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या संघामध्ये झालेल्या रोमांचक सामन्यानंतर सगळीकडे ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या वादळी खेळीची चर्चा सुरू आहे. २९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची ७ बाद ९१ अशी अवस्था झाली असताना मॅक्सवेलने १२८ चेंडूत नाबाद २०१ धावांची खेळी करत संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी मॅक्सवेलच्या या खेळीची तुलना शरद पवार यांच्या राजकीय संघर्षाशी केली आहे.
फेसबूकवर २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचारावेळी शरद पवारांनी पावसात भिजत घेतलेल्या सभेचा आणि काल विस्फोटक फलंदाजी करण-या मॅक्सवेलचा फोटो शेअर करत रोहित पवार म्हणाले की, परिस्थिती कितीही विरोधात असली, मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं. नुसतं लढावंच लागतं असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो. अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते. मग ते मैदान क्रिकेटचे असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलने दाखवून दिले.
दरम्यान रोहित पवार यांनी शेअर केलेल्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काल ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेला सामना स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २९१ धावांचे आव्हान उभे केले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरुवातीपासूनच कोलमडली होती. तसेच त्यांचे ७ फलंदाज ९१ धावांत माघारी परतले होते. मात्र त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने ऐतिहासिक खेळी करताना ऑस्ट्रेलियाला सनसनाटी विजय मिळून दिला होता.