नांदेड : प्रतिनिधी
संत कवि दासगणू महाराजांच्या पावन पदस्पशार्ने पुनीत झालेल्या आणि त्यांच्या अमृतवाणीने भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या गोरठा नगरीत आज संपन्न होत असलेले चौथे मराठी साहित्य संमेलन ही चळवळ वाचन संस्कृतीला बळकट देणारी आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उमरी तालुक्यातील गोरठा येथे पार पडलेल्या चौथ्या मराठी साहित्य संमेलनाचा गौरव केला.
प्राचार्य ग.पि. मनुरकर व्यासपीठावर पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संवेदनशील कवयित्री वृषाली किन्हाळकर या होत्या. साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडी लेझीम टाळ मृदंगाच्या तालावर करण्यात आली. यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे आणि संतोष तळेगाव यांच्यानांदेड जिल्ह्यातील साहित्यिक यांच्या परिचयाचे चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. मुलांपासून तरुणांपर्यंत मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीकडे आपण पाठ फिरवत आहोत. विद्यार्थी केवळ अभ्यासापुरते वाचन करत आहेत परंतु यामुळे वाचन संस्कृती टिकणे कठीण आहे. त्यामुळे वाचन संस्कृती टिकावी यासाठी अशा साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे.
ज्येष्ठ कवी देविदास फुलारी यांनी, अशा संमेलनातून वाचन चळवळ अधिक भक्कम झाली पाहिजे. विद्यार्थी आणि नव तरुणांना त्यातून प्रेरणा प्रेरणा मिळेल. सूत्रसंचालन जेष्ठ कथाकार दिगंबर कदम यांनी केले तर आभार रमेश फुलारी यांनी मांडले. यावेळी साहित्य संमेलनासाठी डॉ. तरु जिंदल, मराठवाडा साहित्य परिषद नांदेड शाखेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, अॅड. विजयकुमार भोपी, भाऊसाहेब गोरठेकर, सरपंच स्वरूपा सूर्यवंशी, शिरीष देशमुख गोरठेकर, दत्ता डांगे आदींची उपस्थिती होती. डॉ. गोविंद नांदेड यांच्या अध्यक्षतेखालील परिसंवादात संत विचाराच्या अभावाने अराजकता वाढत आहे या विषयावर बाबाराव विश्वकर्मा यांनी आपले विचार मांडले. कथाकार दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कथाकथन सत्रात राम तरटे, धाराशिव शिराळे यांनी आपल्या कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर जगन शेळके यांच्या अध्यक्षतेखालील कवी संमेलनाने साहित्य संमेलनात रंगत भरली.