नवी दिल्ली : जग सध्या जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत रोखण्याऐवजी सन २०३० पर्यंत ११० टक्के अधिक जीवाश्म इंधन तयार करण्याच्या मार्गावर आहे. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. यातील डेटानुसार, सन २०३० पर्यंत तेल उत्पादनात २७ टक्के आणि वायू उत्पादनात २५ टक्के तर सन २०५० पर्यंत अनुक्रमे २९ टक्के आणि ४१ टक्क्यांनी वार्षिक वाढ होण्याचा अंदाज आहे.
‘प्रॉडक्शन गॅप’ या रिपोर्टची चौथी आवृत्ती बुधवारी प्रसिद्ध झाली. या अहवालात म्हटले की, भारत, इंडोनेशिया आणि रशिया यांच्या नेतृत्वाखालील उत्पादनात नजीकच्या काळात वाढ होऊन सन २०२० ते सन २०३० दरम्यान वार्षिक जागतिक कोळसा उत्पादन १० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. १५१ देशांनी निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय साध्य करण्याचे वचन दिले असूनही हे घडते आहे. सन २०१५ मध्ये, देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली. या करारातील ठरावांमध्ये जागतिक तापमान हे औद्योगिक पातळीपेक्षा १.५ अंशांपर्यंत रोखायचे आहे.
त्यासाठी सरासरी तापमानवाढ ही २ अंशांपेक्षा कमी ठेवण्याचे वचन दिले आहे. पण, नव्या आकडेवारीनुसार, जागतिक कोळसा, तेल आणि वायूंची या दशकात सर्वोच्च मागणी असेल. सन २०३० मध्ये तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यापेक्षा सुमारे ११० टक्के अधिक जीवाश्म इंधनाचे उत्पादन करण्याची जगभरातील सरकारांची योजना आहे ही तापमानवाढ २ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यापेक्षा ६९ टक्के अधिक आहे अहवालात नमूद केले आहे.