नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विद्यापीठात काल (गुरूवारी) मध्यरात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती आहे. डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये हा राडा झाला.
निवडणूक समिती सदस्य निवडीवरून दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत काही विद्यार्थी देखील जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या गटामध्ये ही हाणामारी झाली. स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये निवडणूक समिती सदस्य निवडीवरून हा मोठा गोंधळ झाला.
विद्यापीठाच्या एका अधिका-याने सांगितले की, चकमकीत जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा एक कथित व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये एक व्यक्ती काही विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करताना दिसत आहे, तर दुस-या क्लिपमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांवर सायकल फेकताना दिसत आहे. घटनेच्या आणखी एका कथित व्हिडिओमध्ये काही लोक इतर लोकांशी भांडताना दिसत आहेत आणि विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या गटातील विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी केल्या. या घटनेवर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.