22 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeमहाराष्ट्रशिवराज्याभिषेक शक २७५ च्या नोंदी आढळल्या

शिवराज्याभिषेक शक २७५ च्या नोंदी आढळल्या

खडकवासला : छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकापासून नवी कालगणना सुरू केली. त्यास ‘राज्याभिषेक शक’ असे नाव त्यांनी दिले होते. दरम्यान, भोर संस्थानमध्ये देश स्वतंत्र होताना झालेल्या नोंदीत ‘राजशक’ २७३ ते २७६ पर्यंतचा उल्लेख जाणीवपूर्वक केल्याची बाब उघडकीस आली. हा उल्लेख कोठे मोडी लिपीत तर, कोठे देवनागरीमध्ये आढळला आहे.

शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस ई.स. ६ जून १६७४ रोजी झाला. महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति’ असा किताब धारण केला. त्यांनी राज्याभिषेकापासून नवी कालगणना सुरू केली. त्यास ‘राज्याभिषेक शक’ असे नाव दिले. जुन्या कागदपत्रात या शकाचा उल्लेख ‘स्वस्तिश्री राज्याभिषेक शके’, किंवा संक्षिप्त रूपात ‘राजशक’ असा केला जात होता. असे मोडी लिपी इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासक डॉ.नंदकिशोर ज. मते यांनी सांगितले.

राजकीय पत्र व्यवहारात ‘राजशक’ लिहिण्याची प्रथा सुरू होती. छत्रपती प्रतापस्ािंह यांच्या १८३० मधील पत्रावर हा उल्लेख आढळतो. राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक १८९४ मध्ये झाला. त्यांच्या पहिल्या जाहीरनाम्याच्या सुरुवातीला ‘स्वस्ति श्री राज्याभिषेक शक’ असे लिहलेले आहे. त्यानंतर, काही काळ राजकीय पत्रव्यवहार वगळता, सामान्य पत्र व्यवहारात ‘राजशक’ चा उल्लेख आढळत नाही.

भोर संस्थान मध्ये प्रचंडगड, राजगड हे तत्कालीन तालुके होते. यातील गावांच्या १९४६ ते १९५० मधील जन्म- मृत्यूची नोंदी असलेल्या रजिस्टरच्या मुख्य पानावर ‘राजशक’चा उल्लेख आहे. यासोबत ‘इंग्रजी’ आणि मुस्लिम ‘फसली’ या कालगणनेचा उल्लेख आढळतो. यावेळी, ‘राजशक’ चा उल्लेख का केला असावा, याचा अंदाज बांधला असता. प्रामुख्याने १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला. त्यावर्षी २७३वे ‘राजशक’ सुरु होते. त्यानंतर, १९४९ साली २७५ वे, आणि १९५० मध्ये २७६वे ‘राजशक’ सुरु होते. म्हणून हा उल्लेख असावा. त्यानंतरच्या काळातील नोंदीत फक्त इंग्रजी कालगणना वापरली आहे. असे डॉ. मते यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR