33.7 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeसोलापूरमराठा तरुणांनी  जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना विचारला जाब

मराठा तरुणांनी  जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना विचारला जाब

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील मराठा समाजाच्या तरुणांनी माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार बबन शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना गावबंदी असताना तुम्ही गावात आलाच कसं असा जाब विचारला. शिवाय तुम्ही ओबीसीचे प्रमाणपत्र काढले, इतर मराठा समाजासाठी का प्रयत्न केले नाहीत, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे विकासकामांच्या उद्‌घाटनासाठी आलेल्या रणजित शिंदे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या रोषाचा अनेक राजकीय नेत्यांना सामना करावा लागत आहे. तसाच प्रकार पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावी झाला आहे. मराठा समाजातील तरुणांच्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार पुत्र रणजित शिंदे यांना विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन न करताच माघारी जावे लागले.

जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष (दूध पंढरी) रणजित शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे हे तुंगत येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलक करणाऱ्यांनी शिंदे आणि काळे यांना गावच्या वेशीवर अडविले. राजकीय नेत्यांना गावबंदी असताना, तुम्ही गावात आलेच कसे, असा सवाल करून त्यांना रोखण्यात आले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात रणजित शिंदे यांची एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांत मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यावेळीही मराठा समाजाच्या रोषाला शिंदे यांना तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर मराठा समाजाची रणजीत शिंदे यांचे वडील आमदार बबन शिंदे यांनी माफी मागितली होती.

ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा रणजित शिंदे यांना विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यापासून मराठा समाजाने रोखले आहे, त्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात सरकारने घेतलेल्या भूमिकेवरून समाजात खदखद व्यक्त होत असल्याचे या घटनेवरून दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR