पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरीत कार्तिकी यात्रेची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो. मात्र, आता प्रथमच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणा-या पूजेसंदर्भात मंदिर समितीसमोर पेच निर्माण झाला आहे. कारण राज्यात यंदा दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पूजेचा मान नेमका कोणाला द्यायचा, यावरून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, याच मुद्यावर चर्चा करण्यासाठी आज मंदिर समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मराठा आंदोलकही दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत यंदाच्या पूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना बोलावू नये, असे म्हटले. तसेच आम्ही त्यांना पंढरीत येऊ देणार नाही, असा इशाराही दिला.
राज्यात आषाढी एकादशीला पंढरीत विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेचा मान मुख्यमंत्र्यांना, तर कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या-त्यावेळी हजर होतात. आता कार्तिकी एकादशी जवळ आल्याने मंदिर समितीने त्यावर विचार विनिमय करण्यासाठी आज बैठक बोलावली होती. आज सकाळी बैठक सुरू होताच सकल मराठा समाजाच्या वतीने किरणराज घाडगे, संदीप मांडवे, रामभाऊ गायकवाड, नितीन शेळके आदी पदाधिका-यांनी मंदिर समितीच्या बैठकीत जाऊन सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांना कोणत्याही उपमुख्यमंत्री अथवा मंत्र्यांना निमंत्रण देऊ नका, असा इशारा दिला.
यावेळी संतप्त आंदोलकांनी आधी आरक्षण, मग पूजा अशी घोषणाबाजी केली. एवढेच नव्हे, तर आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही मंत्री, आमदार अथवा खासदाराला पंढरीत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी घोषणाही केली. त्यामुळे मंदिर समिती बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला. त्यामुळे नेमके कोणाला बोलवायचे, हाही प्रश्न अधांतरीच राहिला. त्यामुळे कार्तिकी पूजेचा मान नेमका कोणाला मिळतो आणि अशा परिस्थितीत मंदिर समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
…तर सरकार, मंदिर समिती जबाबदार
मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप रखडलेलाच आहे. त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक आहेत. त्यातच आता कार्तिकी एकादशीच्या पूजेच्या मुद्यावरून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्तिकी पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिल्यास घडणा-या प्रकाराला राज्य सरकार आणि मंदिर समिती जबाबदार असेल, असा थेट इशारा मराठा आंदोलकांनी दिला. या अगोदर २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढीच्या पूजेला मराठा आंदोलकांनी येऊ दिले नव्हते.
आता शासनच निर्णय घेईल
मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सावध पवित्रा घेत आम्ही आंदोलकांचा प्रक्षोभ सरकारपर्यंत पोहोचवू. पूजेला कोणाला बोलवायचे, याबाबत आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही, तर याबाबतचा निर्णय शासन स्तरावरच होईल, अशी आमची भूमिका असेल, असे सांगितले. त्यामुळे तप्त वातावरणात राज्य सरकार पूजेची जोखीम उचलणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.