जयपूर : केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नामांकनात ‘दोन गंभीर गुन्हे’ लपवल्याचा आरोप केला आहे. बुधवारी त्यांनी राजस्थानच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचीही भेट घेऊन कारवाईची मागणी केली. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी अशोक गेहलोत यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रात त्यांनी दोन अदखलपात्र गुन्ह्यांत त्यांची भूमिका लपवली आहे. जमीन घोटाळा, दरोडा, बळजबरीने एखाद्याच्या घरात घुसणे आणि महिलेचा विनयभंग अशा प्रकरणांमध्ये संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ ए अन्वये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच जोधपूरच्या जिल्हाधिकार्यांकडे मंगळवारी तक्रार करण्यात आली होती आणि ती मुख्य निवडणूक आयुक्तांना दुपारी ४.३० वाजता ई-मेलद्वारे पाठवण्यात आली होती. आता आम्ही राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त केडी यांना कळवले. हा कायदेशीर गुन्हा असल्याने त्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी जोधपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली. जोधपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या आरोपानंतर या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र, या आरोपांवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.