मुंबई : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी पंचांग घेऊन बसलो आहे का, या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना काय वादळ दिसले, हे माहिती नाही. गरीब मराठ्यांचे वाटोळे होत आहे. गोरगरिबांच्या अडचणी, वेदना काय असतात, त्यांना कळणार नाही. त्यामुळे तुम्ही मराठ्यांसमोर पैशांची शाईनिंग दाखवू नये, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टोलेबाजी केली होती. आपल्याला आरक्षण मिळाले होते, त्यानंतर मिळालेले आरक्षण रद्द झाले. त्यानंतर एक वादळ निर्माण झाले. जर-तरच्या गोष्टी सांगायला मी भविष्यवेत्ता नाही. मी पंचाग घेऊन बसलेलो नाही. हा लढा आहे. त्यामुळे शासनाला दमछाक करुन चालणार नाही. आताच आरक्षण द्या, आताच लिहून द्या. जे काही करायचे आहे ते कायद्याच्या चौकटीत करावे लागते. कारण ते टिकले पाहिजे, असं तानाजी सावंत म्हणाले होते. त्यावर जरांगे यांनी मराठा समाजाला सर्वकाही कळते. तुम्ही ज्ञान पाजळायची काही गरज नाही. मराठ्यांना वेड्यात काढून स्वत:ला हुशार समजू नये. तुमची मस्ती इथे दाखवू नका, असे म्हणत त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.