नाशिक : प्रतिनिधी
देशभरात सुरू असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनात आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची एण्ट्री झाली आहे. नानांनी शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. सरकारकडे मागू नका, तर कुठलं सरकार करायचे हे ठरवा, असे आवाहन त्यांनी शेतक-यांना केले आहे. याचसोबत त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याविषयीही भाष्य केले. नाशिकमधल्या शेतकरी साहित्य संमेलनात ते बोलत होते.
शेतक-यांची बाजू घेत नाना म्हणाले, ‘‘आधी ८० ते ९० टक्के शेतकरी होते. आता शेतक-यांची टक्केवारी ५० ते ६० वर आली आहे. तुम्ही सरकारकडे काही मागू नका. आता कुठलं सरकार आणावे, याचा निर्णय घ्या. मला राजकारणात जाता येत नाहीये.
कारण माझ्या पोटात जे आहे ते ओठांवर येते. त्यामुळे दुस-याच दिवशी मला त्या पक्षातून काढून टाकतील. असे करत करत महिनाभरात सगळेच पक्ष संपलेले असतील. मग कशाला जायचे तिथे? इथे तुमच्यासमोर म्हणजेच आमच्या शेतकरी बांधवांसमोर आम्ही मोकळेपणे बोलू शकतो.’