तेलअवीव : हमासच्या हवाई हल्ल्यांचे नेतृत्व करणा-या कमांडरचा खात्मा केल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. इस्राईलचे म्हणणे आहे की, या कमांडरने ७ ऑक्टोबर रोजी हल्ला करणा-यांना सूचना दिल्या होत्या. या कमांडरच्या सूचनेवरून हमासचे पॅरा ग्लायडर इस्राईलमध्ये दाखल झाले होते. हा कमांडर इस्रायली लष्कराच्या (आयडीएफ) चौक्यांवर ड्रोन हल्ल्यांमध्येही सामील असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या लढाईदरम्यान, आयडीएफच्या युद्ध विमानांनी हमासच्या हवाई हल्ल्यांचे निर्देश देर्णाया असीम अबू रकाबाला हल्ला करून ठार केले, असे इस्राईल संरक्षण दलाने सांगितले आहे.
अबू रकाबा हमासच्या यूएव्ही, ड्रोन, पॅरा ग्लायडर, हवाई शोध आणि संरक्षणासाठी जबाबदार होता. ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या हल्ल्यात इस्राईलमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या. आयडीएफच्या लष्करी चौक्यांवर ड्रोन हल्ल्यांसाठीही तो जबाबदार होता, असे आयडीएफने म्हटले आहे. तसेच उत्तर गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट होत आहेत, जे त्यांनी यापूर्वी पाहिले नव्हते. आकाशात ज्वाळा उठताना दिसत आहेत आणि असे दिसते की, इस्राईल वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब वापरत आहे.
रुग्णालयाबाहेरील रुग्णवाहिका चालकांनी माध्यमांना सांगितले की, दूरसंचार सेवा पूर्णपणे बंद असल्याने ते एकमेकांशी संपर्क साधू शकले नाहीत. ज्या दिशेने स्फोटाचा आवाज ऐकू येतो त्या दिशेने ते कार चालवत आहेत. उत्तर गाझामध्येच नव्हे तर खान युनिसमध्येही दहशतीचे वातावरण आहे, येथे उत्तर गाझाच्या तुलनेत कमी बॉम्बस्फोट झाले आहेत. लोक आपल्या प्रियजनांना फोन करू शकत नाहीत आणि सर्वत्र अराजकतेचे वातावरण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.