कोल्हापूर : प्रतिनिधी
शाहू महाराज हे आमच्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय म्हटल्यावर माझा लोकसभा लढण्याचा प्रश्नच येत नाही. स्वराज्य संघटना ही कुठेही लोकसभा निवडणुकीत लढणार नाही, असे सांगून संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेने स्वराज्य संघटना आणि छत्रपती घराण्यातील संभ्रमावस्था अखेर दूर झाली आहे.
गेल्या दीड वर्षापासून संभाजीराजे लोकसभा निवडणुकीची तयारी करत होते. परंतु शाहू महाराजांच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयाने त्यांनी आपली तलवार म्यान केली आहे. दुसरीकडे शाहू महाराजांचे वय विचारता मग मोदींचे वय किती आहे? असा सवाल विचारत भाजपविरोधातील मोर्चाही त्यांनी उघडला. कोल्हापूर हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालते. पुरोगामी विचारांवर चालते. टोकाच्या विचारांना इथे थारा नाही, असे ठणकावून सांगत भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शाहू महाराजांच्या रूपात पुरोगामी पर्याय असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्ष सांगितले. छत्रपती संभाजीराजेंनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
फोटो पाहिलात ना? छत्रपतींचे घराणे किती एकसंध आहे ते कळेल!
स्वराज्य संघटनेच्या घोषणेनंतर शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या नात्यात दरी पडल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. परंतु आमचं छत्रपतींचं घराणं किती एकसंध आहे हे मी पोस्ट केलेल्या फोटोवरून लक्षात आले असेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
मग मोदींचे वय किती?
शाहू महाराजांचे वय विचारता मग मोदींचे वय किती आहे? असा प्रतिप्रश्न विचारत शाहू महाराज याच वेळी निवडणुकीच्या रिंगणात का उतरलेत? याचा ‘त्यांनी’ विचार करावा, असे सांगतानाच ‘हे’ हिंदुत्ववादी का म्हणतात, हे मला समजत नाही. आम्हीही नास्तिक नाहीत. शिवाजी महाराज-शाहू महाराजांनी धर्माला पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजर्षि शाहू महाराजांचे मंदिर बांधले. त्यामुळे पुरोगामी विचाराला वेगळ्या वळणावर हे लोक नेत असतील तर ही चुकीची बाब आहे, असेही त्यांनी भाजपला ठणकावून सांगितले.
शाहू महाराज पैलवान
शाहू महाराज कोल्हापूर मतदारसंघात पूर्ण क्षमतेने फिरतील. ते पैलवान आहेत, आजही त्यांचा खूप प्रवास असतो. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा करता येईल याचा विचार आम्ही करत असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले.