40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रनागपुरात बर्ड फ्लूच्या उद्रेकामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

नागपुरात बर्ड फ्लूच्या उद्रेकामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

नागपूर : नागपुरातील राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसांत रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आली असून या संबंधित योग्य ती काळजी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे.

नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र, तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे, हे तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर चार मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंझाची लागण झाल्याचे सिद्ध झाले.

पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर
शासनाने संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्भव झाल्यानंतर पाळावयाच्या सर्व नियमांचे पालन करत कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केला आहे. राज्य सरकारच्या ज्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला, त्याच्या एक कि.मी.च्या परिघात पशु वैद्यकीय विद्यापीठाचेही पोल्ट्री फार्म असून तिथल्या २६० कोंबड्यांनाही मारण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR