22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरमार्च उजाडला तरी जळकोट मंडळातील शेतक-यांची झोळी रिकामीच

मार्च उजाडला तरी जळकोट मंडळातील शेतक-यांची झोळी रिकामीच

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये कुठे अतिवृष्टी तर कुठे अवर्षण अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये तालुक्यातील शेतक-यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा मिळावा अशी मागणी देखील करण्यात येत होती. यापूर्वी जळकोट तालुक्यातील घोणसी या एकाच मंडळाला २५ टक्के अग्रीम पिक विमा मिळाला होता. जळकोट या मंडळाला अग्रीम मधून वगळण्यात आले होते. यानंतर जळकोट मंडळाला देखील २५ टक्के अग्रीम पीक विमा मिळणार असे सांगितले जात होते परंतु मार्च उजाडला तरी जळकोट मंडळातील शेतक-यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रीम पीक विम्याची रक्कम पडलेली नाही. यामुळे जळकोट मंडळातील शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे जळकोट मंडळातील शेतक-यांना २५ टक्के अग्रीम पिक विमा कधी मिळणार असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
जळकोट मंडळामध्ये खूपच कमी पाऊस झाला होता. जून जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला. यामुळे पीकांची उगवण व्यवस्थित झाली नाही यामुळे या मंडळामध्ये आवर्षण परिस्थिती निर्माण झाली. शेतक-यांच्या डोळ्या देखत सोयाबीन वाळून गेले तसेच कापूस देखील वाळून गेला. मूग उडीद तरी हातात देखील आले नाही. यामुळे या भागातील शेतक-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. यावर्षी शासनाच्या वतीने शेतक-यांना एक रुपयांमध्ये पीक विमा भरण्याची सोय करण्यात आली होती. यामुळे जवळपास सर्वच शेतक-यांनी पीक विमा भरून घेतला होता. जळकोट तालुक्यातील शेतक-यांचे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी पीक विमा मंजूर होईल अशी अपेक्षा होती. परंतु विमा कंपनीकडून काही केल्या पीक विमा मंजूर होत नव्हता. शेवटी जिल्हाधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना २५ टक्के पीक विमा अग्रीम मंजूर करावा असे आदेश काढले. यानंतर अग्रीम देण्यासाठी युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या.
  मात्र जळकोट मंडळातील गावांना मात्र एसबीआय कंपनीने २५ टक्के अग्रीम विम्यातून वगळले त्यानंतर शेतक-यांनी मागणी केली व जळकोट मंडळाला देखील २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. परंतु जळकोट मंडळाचा वाद केंद्रस्तरावर चालू असल्यामुळे अद्यापही जळकोट मंडळातील शेतक-यांना २५ टक्के अग्रीम विमा मंजूर झालेला नाही. यामुळे जळकोट मंडळातील शेतक-यांना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पिक विमा पासून वंचित राहावे लागले आहे. जळकोट मंडळातील शेतक-यांना २५ टक्के अग्रीम विमान न मिळाल्यामुळे येथील शेतकरी सरकारवर प्रचंड नाराज आहे. जळकोट मंडळातील शेतक-यांनी काय गुन्हा केला म्हणून हे मंडळ वगळण्यात आले असा सवाल देखील शेतकरी करत आहेत .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR