इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतातील केटी बंदर पोर्टजवळ ४५ मच्छिमारांना घेऊन जाणारी बोट बुडाली. या बोटीतील ३१ मच्छिमारांची सुटका करण्यात आली, मात्र १४ मच्छीमार अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान सरकार भारताची मदत घेणार आहे.
पाकिस्तानी मीडिया द डॉननुसार, खासदार आगा रफिउल्ला यांनी सांगितले की मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी भारताकडून मदत घेण्याबाबत त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांच्याशी चर्चा केली आहे. ते म्हणाले पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बेपत्ता मच्छिमार भारताच्या हद्दीत गेले असावेत अशी भीती आम्हाला वाटते. या प्रकरणांमध्ये भारत सरकारकडून मदत घेण्यात यावी असा प्रस्ताव आम्ही मांडला. यावर पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तान सरकार याप्रकरणी भारताशी चर्चा करेल आणि त्यांची मदत घेईल.
५ मार्च रोजी बुडाली बोट
खासदार आगा रफिउल्ला म्हणाले की ४५ मच्छिमारांनी भरलेली बोट ५ मार्चला बुडाली. शोध-बचाव मोहिमेदरम्यान आम्ही ३१ मच्छिमारांना वाचवले होते. मात्र अपघात होऊन ५ दिवस उलटले तरी १४ मच्छीमार बेपत्ता आहेत. हे सर्व माझ्या मतदारसंघातील कराची येथील रहिवासी आहेत. मी त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. १ फेब्रुवारी रोजी भारतीय नौदलाने सोमवारी सोमालियाच्या पूर्व किना-याजवळ अरबी समुद्रात १९ पाकिस्तानी खलाशांचे प्राण वाचवले. इराणच्या ध्वजांकित जहाजाचे ११ समुद्री लुटे-यांनी अपहरण केले होते. यानंतर नौदलाने जहाजाच्या सुटकेसाठी आपली युद्धनौका आयएनएस सुमित्रा पाठवली.