36 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयम्हाता-यांचा सामना!

म्हाता-यांचा सामना!

देश किंवा समाज जेव्हा आव्हानांच्या वावटळीत सापडलेला असतो तेव्हा त्या देशाला वा समाजाला प्रस्थापितांपेक्षा वेगळी वाट चोखाळून या आव्हानांच्या वावटळीला समर्थपणे तोंड देणा-या नव्या आशावादी नेतृत्वाची आस लागलेली असते. मात्र, अमेरिकेसारख्या प्रगल्भ मानल्या जाणा-या लोकशाही देशात हे घडत नाही, हे आश्चर्यकारकच आहे. त्या देशातील जनतेचे हे राजकीय प्रक्रियांविषयीचे औदासिन्य आहे की राजकारणाबाबत निर्माण झालेले नैराश्य आहे? असाच प्रश्न या ताज्या घडामोडीतून निर्माण होतो. अमेरिकेतल्या १५ राज्यांमधील प्राथमिक फे-यांमध्ये पराभव झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून निकी हॅले यांनी माघार घेतली आहे.

त्यामुळे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यातच अध्यक्षपदासाठीची लढत होणार आहे. सध्या ज्यो बायडेन यांचे वय ८१ वर्षे आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांचे वय ७७ वर्षे आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या आरोग्याची दरवर्षी सखोल आरोग्य चाचणी होते व त्याचा अहवालही गुप्त ठेवला जात नाही. बायडेन यांच्या आरोग्य चाचणीनंतर त्यांच्या डॉक्टरांनी ते ‘फिट’ असल्याचा अहवाल दिला. त्यांना केवळ गुडघ्यांचा थोडासा त्रास आहे, असा निर्वाळा दिला. मात्र, या अहवालातील गंभीर बाब म्हणजे बायडेन यांना ‘स्लीप अ‍ॅप्निया’ आहे. या विकारात व्यक्तीचा झोपेत असताना अचानक काही क्षणांसाठी श्वास बंद होतो. वय जसजसे वाढत जाते तसतसा हा विकार धोकादायक बनत जातो.

अमेरिकेत सगळ्या बाबींवर सगळेच मोकळेपणाने भाष्य करतात. त्यात कुणाला काही गैर वाटत नाही. त्यामुळे व्हाईट हाऊसच्या एका माजी डॉक्टरांनी ‘बायडेन कोणतेही कार्यालयीन काम करण्याच्या क्षमतेचे राहिलेले नाहीत,’ असे स्पष्ट मत व्यक्त केले होते. तरीही डेमोक्रॅटिक पक्षाला नव्या नेतृत्वाला संधी देण्यापेक्षा ज्यो बायडेन यांच्यावरच डाव लावावा वाटतो. दुसरीकडे ७७ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प आपण दररोज डायट कोकच्या १२ बाटल्या फस्त करतो असे अभिमानाने सांगत असले व ‘मी ३५ वर्षांचा असल्यासारखे मला वाटते आणि माझे खाणेपिणे नियमित केले तर मी दोनशे वर्षे आरामात जगेन,’ असा दावा करत असले तरी त्यांची वयोमानाप्रमाणे दुबळी होत चाललेली आकलन शक्ती रोजच जाहीर होते आहे. या दोघांचीही स्मरणशक्ती कसा दगा देते, बोलताना संदर्भ कसे चुकतात याचे असंख्य नमुने समाजमाध्यमांवर फिरत असतात. मात्र, तरीही अमेरिकी नागरिकांना या दोन म्हाता-यांमधूनच आपला तारणहार निवडावा लागणार, हे जगातल्या सर्वांत प्रगल्भ मानल्या जाणा-या लोकशाहीतील जळजळीत वास्तव आहे! हे दोघे काय करू शकतात, त्यांची ध्येयधोरणे कोणती, कार्यपद्धती कशी,

गुण व अवगुण कोणते, कार्यक्रम कोणते, भूमिका कोणत्या हे सगळेच जगजाहीर आहे. त्याचा अनुभव अमेरिकेच्या जनतेनेच नाही तर जगानेही घेतलेला आहेच. थोडक्यात हे दोघे अमेरिकेच्या प्रस्थापित राजकारणाचे प्रतिनिधित्वच करतात. त्यांच्या या प्रस्थापित राजकारणाला धक्का देणारा कोणी प्रभावीपणे अमेरिकेत पुढे येऊ शकला नाही, ही या प्रगल्भ मानल्या जाणा-या लोकशाहीची खरी शोकांतिका आहे. त्याची कारणे अमेरिकेतल्या सुज्ञांना शोधावी लागतील. थोडक्यात आता अमेरिकेत दोन म्हाता-यांचाच सामना होणार आहे व अमेरिकींना या दोघांपैकी एका म्हाता-याला आपला अध्यक्ष म्हणून निवडावे लागणार आहे. ‘मी निवडलेला अध्यक्ष चार वर्षांच्या कार्यकाळात मरण पावला तरी मी त्यालाच मत देणार,’ अशी निवेदने अमेरिकेत सध्या प्रसिद्ध होऊ लागली आहेत. त्यातूनच अमेरिकी नागरिकांची मानसिक असहाय्यता स्पष्ट होते. जानेवारीत अमेरिकेत झालेल्या एका चाचणीत २१ टक्के नागरिकांनी ‘देशाला चांगले नेतृत्व नाही’, अशी खंत व्यक्त केली होती. आता या दोन ज्येष्ठांपैकी जो कुणी निवडून येईल तो देशासमोर जे असंख्य प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत त्यांना तडफेने भिडेल का? हा खरा अमेरिकी नागरिकांसमोरचा प्रश्न आहे.

आक्रस्ताळे व आक्रमक असणा-या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात घातलेला गोंधळ व त्यातून देशातच निर्माण होत असलेला विभाजनवाद याचे धोके लक्षात घेऊन अमेरिकी नागरिकांनी मागच्या निवडणुकीत त्यांना नाकारून बायडेन यांना निवडले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी आक्रस्ताळेपणा करत आपल्या समर्थकांना चिथवून हल्ला घडवण्याच्या केलेल्या प्रकाराने जगभर अमेरिकेची लाज निघाली होती. त्या प्रकरणात कोर्टबाजी झाली व ते अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतील का याविषयीच शंका होती. कोर्टबाजीतून ट्रम्प अपात्र ठरावेत हीच डेमोक्रॅटिक पक्षाचीच नव्हे तर ट्रम्प यांच्या स्वपक्षीय रिपब्लिकन सहका-यांचीही इच्छा होती. मात्र, तसे काही घडले नाही. ट्रम्प स्वपक्षीय व विरोधकांना भारी पडत निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून उतरले आहेत. पक्षात ट्रम्प यांना पर्यायच निर्माण न होणे हे रिपब्लिकन पक्षाचेही ढळढळीत अपयशच आहे. दुसरीकडे ज्यो बायडेन यांच्या निष्क्रियतेवर अमेरिकी जनता नाराज आहे. जागतिक प्रश्न हाताळताना बायडेन फारशी चमक दाखवू शकलेलेच नाहीत. मात्र, देशांतर्गत परिस्थिती व समस्या हाताळण्यातही ते अपयशी ठरले आहेत. त्यातूनच ट्रम्प यांना वाढता पाठिंबा मिळतो आहे.

मात्र, हे सर्व दिसत असूनही डेमोक्रॅटिक पक्षाला बायडेन यांना पर्याय म्हणून पक्षातून कुणाला पुढे आणता आलेले नाही. हे या पक्षाचेही अपयशच! पराभवानंतरही ट्रम्प कधीच पडद्याआड गेले नाहीत. भल्याबु-या कारणांनी ते सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिले. ट्रम्प यांची विखारी भूमिका देशाला किती घातक आहे हे पटवून देण्यात बायडेन सत्तेवर असूनही अपयशीच ठरले. त्यामुळेच आता पुन्हा डोनाल्ड ट्रम्प तेवढ्याच आक्रमक व आक्रस्ताळेपणे बायडेन यांच्यासमोर शड्डू ठोकून उभे आहेत. बायडेन यांची प्रतिमा संयमी नेता अशी असली तरी रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास ही युद्धे थांबविण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांचा संयम आता त्यांची निष्क्रियता ठरतो आहे. बायडेन यांच्या या निष्क्रियतेचा जगातल्या अनेक गरीब व विकसनशील देशांना जोरदार फटका बसला आहे व या देशांच्या अर्थव्यवस्था धोक्यात आल्या आहेत. दुर्दैवाने अशा स्थितीतही अमेरिकी नागरिकांसमोर या दोन म्हाता-यांच्या सामन्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही त्यामुळे त्यापैकी एकाला पुन्हा चार वर्षे सहन करणे त्यांना व पर्यायाने जगालाही भाग आहे, हे मात्र निश्चित.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR