लातूर : प्रतिनिधी
शिस्तीचा पक्ष समजल्या जाणा-या भारतीय जनता पार्टीच्या येथे दि. ९ मार्च रोजी झालेल्या बैठकीत आजी-माजी शहर जिल्हाध्यक्षांत चांगलीच झुपली. लाथा-बुक्क्यांनी फ्री स्टाईल हानामारी झाली. या घटनेने भाजपाच्या ‘शिस्तीचा’ कडेलोट झाला. दरम्यान पक्षाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे व लोकसभा निवडणुक प्रभारी किरण पाटील यांनी हस्तक्षेप करुन राडा शांत केला. या घटनेची राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरु आहे.
भाजपाच्या पदाधिका-यांची शनिवारी सकाळी ११ वाजता येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पक्षाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे व लोकसभा निवडणुक प्रभारी किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने आढावा घेत होते. बैठक सुरु झाल्यानंतर विविध विषयांवर चर्चा सुरु झाली. यात लातूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी किरण पाटील यांच्याकडे एक यादी दिली. पाटील यांनी यादी वाचायला सुरुवात केल्यानंतर त्यात आपल्या समर्थकांची नावे नाहीत हे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या लक्षात आले. त्यांनी यावर आक्षेप घेतला. यातून काळे व मगे यांच्यात बाचाबाची झाली. काळे आणि मगे यांच्यात अनेक वर्षांपासून धुसपूस होती. ती यानिमित्ताने बाहेर पडली. काळे आणि मगे यांच्यात हमरीतूमरी सुरु असताना दोघांचेही समर्थक उठले आणि भिडले.
देविदास काळे आणि गुरुनाथ मगे यांच्यात हमरीतुमरी होत चक्क लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली. दरम्यान माजी शहर जिल्हाध्यक्ष मगे यांच्या काळात आलेल्या कोट्यावधींच्या कामांचा हिशेब द्या, अशी मागणी काहींनी केली तर विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष यांनीही आपला कोट्यावधींच्या कामाचा हिशेब द्यावा, अशी मागणी केली. टक्केवारीवरुन ठिणगी पडली आणि हे प्रकरण धराधरी, मारामारीपर्यंत गेले. दरम्यान कोडगे व पाटील यांनी दोघांची चांगलीच कानउघाडणी केली.