37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूर२ हजार गर्भवतींना मिळणार 'बाळंत विडा'

२ हजार गर्भवतींना मिळणार ‘बाळंत विडा’

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील कुपोषण आणि माता मृत्युदर कमी करण्यासाठी जिल्ह्यातील गर्भवती महिलांना ड्रायफ्रूटसह विविध घटकांचा समावेश असलेला ‘बाळंत विडा’ किट देण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणा-या या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील २ हजार गर्भवतींना होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२३-२४ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना मधून ‘वन स्टॉप सोल्युशन सेंटर फॉर वूमन अँड चाईल्ड’ या नाविन्यपूर्ण उपक्रमात जिल्ह्यातील एकूण ८७ अंगणवाडी केंद्रांची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत २ हजार गर्भवती महिलांसाठी ‘बाळंत विडा’ किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माता मृत्यू दर कमी करणे, गाव कुपोषणमुक्त करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

किट बरोबरच इतर साहित्यही मिळणार
‘एक हजार दिवस बाळाचे’ या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ‘बाळंत विडा’ किटमध्ये प्रत्येकी एक किलो खारीक, गूळ, फुटाणा डाळ, शेंगदाणे, प्रत्येकी अर्धा किलो गावरान तूप व खोबरे, प्रत्येकी पाव किलो बदाम, डिंक, काजू, आळीव, जवस, तीळ, ओवा, बडीशेप, तसेच काळे मीठ, २ बेडशीट, २ टॉवेल, आईसाठी २ गाऊन आदी सामग्री दिली जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे महीला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी सांगीतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR