27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र

राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र

पुणे : राज्यातून आता पहाटेच्या वेळी पडणा-या थंडीनेही काढता पाय घेतला असून, उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये होणा-या हवामानबदलांचे थेट परिणाम महाराष्ट्रावरही दिसत असून, विदर्भापासून कोकणापर्यंत तापमानवाढ नोंदवली जात आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या मोठी तापमानवाढ पाहायला मिळत असून पारा ३७ अंशांच्याही पलिकडे पोहोचल्यामुळे या झळा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम करताना दिसत आहेत.

राज्याच्या कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही दुपारच्या वेळी उन्हाचा दाह सोसेनासा झाला आहे. तर, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या मैदानी क्षेत्रासह डोंगराळ भागांमध्येही ऊन आणखी तीव्र होत आहे.

परिणाम डोंगरद-यांमध्ये दिसणारी हिरवी खुरटेही आता या तीव्र सूर्यकिरणांनी करपून जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राज्यातील अनेक डोंगररांगांवर आता दूरदूरपर्यंत रखरखाट पाहायला मिळत असून, उष्णतेच्या लाटा भीती वाढवत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती असताना आता एप्रिल, मे आणि जून महिन्यापर्यंत नेमके कसे चित्र असेल असाच प्रश्न अनेकांना पडत आहे.

सकाळी गारवा अन् दुपारी उन्हाचे चटके
मात्र, राज्यातील किमान तापमानात अजूनही चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत सोमवारी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ नोंदविण्यात आली.

सर्वाधिक तापमान वाशिम येथे
राज्यात सर्वाधिक तापमान वाशिम येथे ३९.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. अकोला येथे ३८.४ अंश सेल्सिअस, वर्धा येथे ३८.६ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर येथे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही सोलापूर ३९.२ अंश सेल्सिअस, मालेगाव ३८.४ अंश सेल्सिअस, सांगली ३८.६ अंश सेल्सिअस येथे सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR