बीड : मनोज जरांगे पाटील मागच्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी मागणी करत आहेत. सध्या ते मराठवाड्यातील ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत.
आज बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ते लोकांशी संवाद साधत आहेत. केजमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, मला मनोज जरांगे पाटील म्हणतात आणि मला अटक करायला हिंमत लागते, असे जरांगे पाटील म्हणाले.
माझा मराठ्यांना शब्द आहे. जेलमध्ये सडेल पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. देवेंद्र फडवणीस चिल्लर चाळे करतात. मस्ती करणा-याला आव जाव करत नसतात. मराठ्यांच्या नादी लागाल तर तुमचं राजकारण संपून जाईल. आजपासून देवेंद्र फडणवीस यांना आहो जाहो बोलणे बंद! देवेंद्र फडणवीस यांनी पातळी सोडली आहे. तुझ्या एसटी रिकाम्या जातात. आम्ही काय करावं? तू काय बधिर झालेला मंत्री आहे का? तू मला जेलमध्ये टाक आणि मग मराठे काय करतात बघ!, असा इशाराच जरांगेंनी दिला आहे.
असा गृहमंत्री पाहिला नाही- जरांगे
तू काय इंग्रजांच्या काळात विसरून राहिला काय? माझ्या घरावरचे पत्रे तुझ्या नागपूरच्या घरावर टाकतो का? जुन्या प्रकरणात गुन्हे दाखल करत आहे. तू मला ‘सागर’ बंगल्यावर येऊ द्यायला पाहिजे होते. मग तुला कळले असते. मी ऐकत नसेल तर माझ्यावर हल्ला करण्याचा डाव टाकला आहे. सर्व पोलिस बंदोबस्त कमी केला आहे. म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला करावा.
आरक्षणावर जरांगे काय म्हणाले?
जरांगे पाटील यांचा सध्या मराठा संवाद दौरा सुरू आहे. जरांगे पाटील आज बीड जिल्ह्यातील केजमध्ये आहेत. ते या ठिकाणी मराठा समाजाशी संवाद साधत आहेत. मराठ्यांची लेकरे मोठी व्हावीत, यासाठी लढा सुरू आहे. सरकारचा एकही डाव यशस्वी होऊ दिला नाही. सात महिन्यांपासून हा लढा सुरू आहे. मराठ्यांनी ही लढाई जिंकत आणली होती. सात महिने झाले हे आंदोलन मराठ्यांंनी ताकदीने लावून धरले आहे. किती दिवस लागले तरी हा लढा सुरूच राहणार आहे, असे मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी बोलताना म्हटले.