25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रदूध उत्पादक शेतकरी श्रीमंत होणार; विखे पाटलांची जाहिरात !

दूध उत्पादक शेतकरी श्रीमंत होणार; विखे पाटलांची जाहिरात !

किसान सभेचा जोरदार हल्लाबोल

नगर : राज्य सरकारने दूध उत्पादक शेतक-यांना ५ रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप हे अनुदान शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले नाही.

अशातच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची एक जाहिरात प्रसिद्ध होत आहे. यामध्ये दूध उत्पादक शेतकरी श्रीमंत होणार, मार्चअखेर दुधाचे अनुदान शेतक-यांना मिळणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्यावरून किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विखे पाटलांचा हा प्रकार शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असल्याचे नवले म्हणाले.

दुधाचे अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे मात्र, अटी-शर्ती व ऑनलाईन डेटाच्या जटीलतेमुळे शेतक-यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाच रुपयांच्या न मिळालेल्या अनुदानाच्या जोरावर शेतकरी श्रीमंत होणार असल्याच्या जाहिराती करत असतील तर यापेक्षा अधिक खेदजनक दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही असे अजित नवले म्हणाले. राज्यातले सरकार आणि दुग्धविकास मंत्र्यांचा अशा जाहिरातीबाबत, असंवेदनशीलतेबाबत तसेच निष्क्रियतेबाबत करावा तेवढा निषेध थोडा असल्याचे अजित नवले म्हणाले.

दूध उत्पादक शेतकरी संकटात
दरम्यान, सध्या दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. कारण दुधाच्या दरात घसरण झाली आहे. दुधाच्या दरात घसरण झाल्याच्या मुद्यावरून वेळोवेळी किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आवाज उठवला होता. त्यानंतर सरकारने दूध उत्पादक शेतक-यांना पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप शेतक-यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. या महिन्याच्या अखेरपर्यंत हे अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. याचीच एक जाहिरात अहमदनगर जिल्ह्यातील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. याच मुद्यावरून किसान सभेचे नेते अजित नवले यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR