24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांना कोणत्याही क्षणी अटक शक्य

केजरीवाल यांना कोणत्याही क्षणी अटक शक्य

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या दारू धोरण अमलबजावणी प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरव्ािंद केजरीवाल यांना आतापर्यंत ९ समन्स पाठविले आहेत. मात्र, त्यापैकी एकाही समन्सला केजरीवाल यांनी उत्तर दिलेले नाही. ईडीने पाठविलेली सर्व समन्स बेकायदेशीर आहेत असे सांगून त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले होते. तर, दुसरीकडे केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांनी चौकशी दरम्यान अटक करू नये म्हणून न्यायालयाकडे संरक्षण मागितले. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेतून दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल हे शुक्रवारी ईडीसमोर हजर होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. कदाचित त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

दिल्ली हायकोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तीच्या कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. न्यायालयाने या प्रकरणात ईडीकडून उत्तर मागितले आणि २२ एप्रिल २०२४ ला पुढील सुनावणी होणार आहे.

अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करून आपल्यावर कठोर कारवाई करू नये, अशी मागणी केली होती. या याचिकेवर आज गुरुवारी न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि मनोज जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दणका देत ईडीकडून कठोर कारवाई करण्याबाबत कोणताही आदेश देण्यास नकार दिला. तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या याचिकेवर तपास यंत्रणेला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. केजरीवाल यांच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, तपास यंत्रणेला जी काही माहिती किंवा ज्ञान हवे असेल ते द्यायला मी तयार आहे, परंतु अरविंद केजरीवाल यांना तपास यंत्रणेकडून अटक होण्याची भीती आहे. अशा स्थितीत अटक झाल्यावर सुरक्षेची गरज आहे.

ईडीने सांगितले की, अरविंद केजरीवाल हे लोकसभेचे उमेदवार नाहीत. त्यावर कोर्ट म्हणाले, पण केजरीवाल पक्षाचे आश्रयदाते आहेत. त्यानंतर ईडीने न्यायालयाला सांगितले की, आम्ही त्यांना अटक करण्यासाठी बोलावतोय, असे कधी सांगितले नाही. मात्र ईडीने न्यायालयाला सांगितले की, आमच्याकडे पुरावे आहेत आणि या तरतुदीनुसार केजरीवाल यांना अटक करू शकतो. त्यावर न्यायालयाने ईडीला २.३० पर्यंत पुरावे सादर करण्यास सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR