सध्या सुरू असलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा समाप्तीच्या मार्गावर आहे. उपान्त्य फेरीत खेळणारे पहिले चार संघ निश्चित झाले आहेत. भारत १६ गुणांसह पहिल्या, १२ गुणांसह द. आफ्रिका दुस-या तर १२ गुणांसह ऑस्ट्रेलिया तिस-या आणि १० गुणांसह न्यूझिलंड चौथ्या क्रमांकावर आहे. द. आफ्रिका व ऑस्ट्रेलियाचे समान १२ गुण असले तरी सरस नेट रन रेटच्या आधारावर द. आफ्रिका दुस-या क्रमांकावर आहे. द. आफ्रिकेचा रन रेट (धावगती) +१.३७ तर कांगारूंचा रन रेट +०.८६१ आहे. भारत, द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. न्यूझिलंडचे साखळीतील सर्व नऊ सामने पूर्ण झाले आहेत.
मात्र त्याचा नेट रन रेट +०.७४३ असल्याने त्यांचा चौथा क्रमांक निश्चित आहे. त्यांचा चौथा क्रमांक हिसकावून घेण्याची पाकिस्तानला संधी होती परंतु त्यांचा रन रेट +०.०३६ असा कमालीचा कमी असल्याने त्यांना न्यूझिलंडला धक्का देणे केवळ अशक्य आहे. नेट रन रेटच्या समीकरणाचे गणित मोठे मजेशीर आहे. पाकचा इंग्लंडविरुद्धचा सामना शिल्लक आहे. हा सामना पाकने जिंकला तर त्यांचेही न्यूझिलंडच्या बरोबरीने १० गुण होतील. परंतु त्यांना चौथा क्रमांक मिळणार नाही कारण धावगतीत ते मार खातात. किवीजची धावगती मागे टाकायची असेल तर पाकने प्रथम फलंदाजी केल्यास इंग्लंडला २८७ धावांनी पराभूत करावे लागेल. अथवा इंग्लंडने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांनी दिलेले लक्ष्य पाकला अवघ्या १६ चेंडूत पार करावे लागेल. म्हणजे समजा इंग्लंड संघ १५० धावांत गारद झाला तर पाकला १५१ धावा केवळ १६ चेंडूत काढाव्या लागतील. म्हणजेच पाक संघ ९९.९९ टक्के स्पर्धेतून बाद झाला आहे. आता त्यांना इंग्लंडविरुद्धचा शेवटचा सामना खेळण्यासाठी चंबूगबाळ आवरूनच मैदानात उतरावे लागेल.
बाद फेरी गाठण्यासाठी दुस-या संघावर विसंबून राहिले की असेच होणार! चौथा क्रमांक निश्चित करण्यासाठी न्यूझिलंडने श्रीलंकेला पराभूत करणे ‘मस्ट’ होते. किवीज्ने ते सहज साध्य केले. बोल्टने ३ बळी घेत श्रीलंकेला १७१ धावांत गुंडाळले आणि विजयी लक्ष्य २३.२ षटकांत गाठले. श्रीलंका पराभूत झाल्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची गोची झाली. गुणतालिकेत श्रीलंका नवव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने पराभूत होताना पाक आणि अफगाणला जणू काही असे बजावले की ‘हम तो डूबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे’! बाद फेरीत मात्र नेट रन रेटचे महत्त्व उरणार नाही!…. जो हार गया, वो मर गया!