पुणे : प्रतिनिधी
राज्यातील उसाच्या गाळप हंगामास सुरुवात झाली असली तरी दिवाळीनंतर हंगामास वेग येणे शक्य आहे असे दिसते. त्यातच राज्यातील बदलत्या हवामानाचा परिणाम उसावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यातील शंभरपेक्षा अधिक साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे.
यंदा एकूण १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाले आहे. परवाना दिलेल्या साखर कारखान्यांमध्ये सहकारी कारखान्यांपेक्षा खासगी कारखान्यांची संख्या अधिक असल्याचे दिसते आहे. यंदा साखर आयुक्तालयाकडे एकूण २१७ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील १०० पेक्षा अधिक कारखान्यांचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. सध्या दिवाळी सण असल्याने ऊस तोडणीसाठी कर्मचारी संख्या मर्यादित आहे.
गेल्या वर्षी राज्यात २११ साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून १०५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन ८८.५८ लाख मेट्रिक टन एवढे होण्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला. हंगाम २०२२-२३ मध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा क्रमांक आहे.