पाली : राजस्थानात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून एकापेक्षा एक आश्वासनं निवडणुकीत उतरलेल्या सर्वच पक्षांकडून दिली जात आहेत. यामध्ये आता सत्ताधारी गेहलोत सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, शेण आणि गोमुत्र खरेदी केले जाणार आहे. राजस्थानातील पाली इथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले की, सरकारने एक निर्णय घेतला आहे की, आता गाय आणि म्हशीचे शेण २ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केले जाईल. यापासून खत तयार केले जाईल ज्याचा वापर शेतांमध्ये केला जाईल. यापासून बायोगॅसही तयार केला जाईल. तसेच गोमुत्रापासून औषधे तयार केली जातील.
निवडणुकीत किती होणार फायदा?
शेतक-यांना उत्पन्नाचे साधन आणि धार्मिक आस्था अशा दोन्ही अँगलने विचार करत सरकारने निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला आहे. आता मते मिळविण्याच्या दृष्टीने या निर्णयाचा किती फायदा गेहलोत सरकारला होतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.