नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी त्यांचे अमेरिकन समकक्ष लॉयड ऑस्टिन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ते म्हणाले की, चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात सामरिक मुद्द्यांवर एकमत होत आहे. टू प्लस टू डायलॉगच्या पाचव्या आवृत्तीदरम्यान भारताशी झालेल्या चर्चेनंतर ऑस्टिन म्हणाले की, भारताला लवकरात लवकर ड्रोन क्षमता मिळावी यासाठी सरकार या दिशेने सतत प्रयत्न करत आहे.
भारत-अमेरिका यांच्यातील २ प्लस २ मंत्रीस्तरीय बैठक शुक्रवारी सुरू झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, दोन्ही देशांमधील भागीदारी “मुक्त आणि नियम-बद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. भारताकडून राजनाथ यांच्याशिवाय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या चर्चेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. यामध्ये अमेरिकेच्या बाजूचे नेतृत्व अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी केले.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर ऑस्टिन म्हणाले की, आमचे संबंध केवळ चीनच्या पीपल्स रिपब्लिकशी संबंधित नाहीत. दोन्ही देशांमधील संबंध अनेक गोष्टींवर आधारित आहे. हे नाते सामायिक मूल्ये आणि लोकशाहीवर आधारित आहे. आम्ही समुद्राखालील आणि अंतराळ तंत्रज्ञानाच्या जगातही सहकार्य करत आहोत.