नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी संध्याकाळी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले की, आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी बोर्डाने शुक्रवारीच झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला. या प्रसिद्धीपत्रकात आयसीसीने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सदस्य असल्याने श्रीलंका क्रिकेट आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्यात अपयशी ठरले आहे.
आयसीसीचे म्हणणे आहे की, श्रीलंका स्वतंत्रपणे कारभार चालवण्यासही सक्षम नाही. आणि श्रीलंका क्रिकेट हे सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय श्रीलंकेतील क्रिकेटचे प्रशासन आणि नियमन यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडू शकेल याची खात्री करण्यास सक्षम नाही. यासोबतच या निलंबनाच्या अटींवर आयसीसी बोर्ड येत्या काळात निर्णय घेईल, असे सांगण्यात आले आहे.