नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या या परंपरागत मतदारसंघात काँग्रेसतर्फे रश्मी बर्वे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता शिवसेना विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी आज शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेसतर्फे आपल्याला माहिती देण्यात आली नाही, विश्वासात घेतले गेले नाही. भीमशक्ती, शिवशक्तीच्या बळावर माझा विजय निश्चित असून कुठल्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नाही. आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे असून हा परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ असल्याचे साखरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी देखील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण लवकरच अर्ज भरणार असल्याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी गजभिये यांनी आपण काँग्रेसचेच पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असून वेळप्रसंगी रश्मी बर्वे यांचा अर्ज जात प्रमाणपत्रामुळे रद्द करण्यात आला. तर आपल्याला पक्षाने एबी फॉर्म द्यावा, अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आज त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीची अडचण होण्याची चिन्हे आहेत.