नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना बुधवारी पाठिंबा जाहीर केला. येथील वंचितचे अधिकृत उमेदवार व भाजपचे बंडखोर शंकर चहांदे यांनी कौटुंबिक कारणावरून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
रामटेकमध्ये काँग्रेसच्या आधीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता. आता चहांदे यांनी माघार घेतली. रामटेकमध्ये सातत्याने नाट्यमय राजकीय घडत असल्याने मतदार बुचकळ््यात पडले आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वंचितने किशोर गजभिये यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर चहांदे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते. गजभिये हे काँग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते उमेदवारी मागे घेतील अशी शक्यता वर्तविली जात होती. रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यास आपल्या नावाचा विचार केला जाईल, असे गजभिये यांना वाटत होते. हे बघून वंचितने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता, असे समजते.