नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मार्च महिन्यात जीएसटी संकलनात मोठी वाढ झाली आहे. आजवरचे दुस-या क्रमांकाचे सर्वाधिक महसूल संकलन मार्च महिन्यात झाले आहे. १.७८ लाख कोटी रुपये इतके मासिक जीएसटी महसूल संकलन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये ११.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
देशांतर्गत व्यवहारांमधून वस्तू आणि सेवा कर संकलनात १७.६ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्यामुळे हे विक्रमी संकलन झाले. मार्च २०२४ मध्ये परतावा दिल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल १.६५ लाख कोटी रुपये इतका आहे. जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १८.४ टक्के वाढलेला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ हा एक मैलाचा दगड ठरला असून या कालावधीतील एकूण वस्तू आणि सेवा कर संकलन २० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून २०.१४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत ११.७ टक्क्यांनी वाढलेले आहे. या आर्थिक वर्षातील सरासरी मासिक संकलन १.६८ लाख कोटी रुपये आहे. जे मागील वर्षाच्या १.५ लाख कोटीच्या सरासरीला मागे टाकणारे आहे. चालू आर्थिक वर्षासाठी मार्च २०२४ पर्यंत परताव्यानंतर जीएसटी महसूल १८.०१ लाख कोटी रुपये आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १३.४ टक्क्यांनी वाढलेले आहे.