पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे पुणे दौ-यावर आहेत. त्यानी आज राष्ट्रवादीच्या वीज दरवाढीविरोधात असलेल्या आंदोलनाला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी रवींद्र धंगेकर यांच्यावर झालेल्या ट्रोलिंग संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच त्यांनी राज्याची परिस्थिती आणि दुष्काळावरदेखील भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विरोधकांनी रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शिक्षणावरून ट्रोल केले. असे ट्रोल करणे चांगले नाही मात्र रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपाला बोलायला काहीच नाही, म्हणून ते ट्रोल करत आहेत.
लोकांना या देशामध्ये बदल हवाय. लोक भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाईला कंटाळले आहेत आणि हे सरकार शेतक-यांच्या, कामगारांच्या आणि महिलांच्या विरोधातील आहे. त्यामुळे लोकांना आता बदल हवाय. हा बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष!
राज्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. धरणात पाणी नाही. दुष्काळासाठी मला काम करायचं आहे. दुष्काळासंदर्भात हे सरकार असंवेदनशील आहे. दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मी राजकारणापेक्षा दुष्काळाकडे लक्ष देत आहे, असेही ते म्हणाले.
जनतेला वीज दरवाढीचा शॉक
महाराष्ट्रातील फडणवीस-पवार-शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीजदर यात वाढ करून फडणवीस-पवार-शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी १५ टक्के वाढ केली आहे, असे आरोप सुप्रिया सुळेंनी केले आहेत.