लखनौ : दिवाळीनिमित्त शनिवारी अयोध्या शहरात दिव्यांचा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला होता. रामाची नगरी आज २२ लाखाहून अधिक दिव्यांनी उजळून निघाली. विशेष म्हणजे अयोध्येने स्वतःचाच विश्वविक्रम मोडला असून एकाच वेळी २२ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. पुन्हा एकदा नवा विक्रम अयोध्येच्याच नावावर लिहला जाणार आहे.
प्रभू रामाची नगरी असलेल्या अयोध्येने दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव सोहळ्यात एकाच वेळी ५१ घाटांवर सुमारे २२.२३ लाख मातीचे दिवे प्रज्वलित करून ही कामगिरी केली. २०१७ मध्ये अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. त्या वर्षी, सुमारे ५१,००० दिवे लावले गेले आणि २०१९ मध्ये ही संख्या ४.१० लाख झाली. २०२० मध्ये ६ लाखांहून अधिक मातीचे दिवे आणि २०२१ मध्ये ९ लाखांहून अधिक मातीचे दिवे लावले गेले.
२०२२ मध्ये राम की पायडी या घाटांवर १७ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. तथापि, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने केवळ पाच मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ प्रज्वलित राहिलेल्या दिव्यांचा विचार केला आणि १५.७६ लाखांचा विक्रम नोंदवला गेला.