धाराशिव : प्रत्येक राजकीय पक्षात निष्ठावंत कार्यकर्ते असतात. ज्यांनी उभ्या आयुष्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकाच चिन्हाला मतदान केलेले असते. परंतु महाराष्ट्राचे राजकारण एका विचित्र वळणावर गेल्याने आता कार्यकर्त्यांना, मतदारांना आयुष्यात कधीही मतदान न केलेल्या चिन्हावर मतदान करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेना, भाजपाच्या बहुतांश मतदारांनी उभ्या आयुष्यात घड्याळ, हाताचा पंजा या चिन्हावर मतदान केलेले नव्हते.
तर बहुतांश मतदारांनी धनुष्यबाण, कमळ या चिन्हावर मतदान केलेले नव्हते. परंतु गेल्या चार वर्षात राजकारणाचा पोत बदलला. राजकारणात नवीन सोयरीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक लागली आहे. महायुतीमध्ये उस्मानाबादची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली असून घड्याळ चिन्ह आहे. उभ्या आयुष्यात ज्यांनी (शिवसेना-भाजप) घड्याळाला मतदान केले नाही, अशा लोकांवर घड्याळाचा प्रचार करण्याची वेळ नियतीने आणली आहे.