मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे वंचितने आता दुसरी उमेदवारी रद्द केल्याने वंचितचे नेमके चालले तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. पण बांदल यांची उमेदवारी का रद्द करण्यात आली, याचे कारणंही वंचितने दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
बांदल यांची उमेदवारी का केली रद्द?
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तिथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. पण वंचितच्या या धोरणाविरोधात बांदल यांनी भूमिका घेतल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावतीतूनही उमेदवाराची माघार
यापूर्वी वंचितने अमरावती इथून आपला उमेदवार जाहीर केला होता. प्राजक्त पिल्लेवान या त्यांच्या उमेदवार होत्या. त्यांनाही अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितने अर्ज न भरण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे त्यांना या जागेवरही उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. पण याचे कारण म्हणजे अमरावतीतून प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधु आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भाजपला मदत होऊ नये म्हणून पिल्लेवान यांची उमेदवारी मागे घेत असल्याचे वंचितने म्हटले होते.