धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धाराशिव लोकसभेच्या जागेवरून शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक झाला आहे. धारशिवची जागा ही पारंपरिक शिवसेनेची आहे.
त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाला या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी बार्शीचे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकरांनी केली आहे. शिवसेनेकडून धनाजी सावंत यांना किंवा मला उमेदवारी द्यावी असेही आंधळकर म्हणाले.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे बार्शीतील नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आंधळकर म्हणाले की, ही राजकीय भेट नाही. मी आंबेडकरांकडे वेगळ्या कामासाठी आलो होतो, अशी माहिती आंधळकरांनी दिली. दरम्यान, आंधळकर धाराशिवमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचेही बोलले जात होते. मात्र, आंधळकरांनी याबाबत नकार दिला. मी सच्चा शिवसैनिक असल्याचे त्यांनी सांगितले. धारशिवची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असे आंधळकर म्हणाले.
धारशिवची जागा शिवसेनेलाच द्यावी
दरम्यान, धाराशिवच्या जागेसंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील चर्चा केल्याची माहिती भाऊसाहेब आंधळकरांनी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत धारशिवची जागा शिवसेनेलाच द्यावी अशी मागणी आम्ही केल्याचे आंधळकर म्हणाले. त्यामुळे जर आम्हाला जागा मिळाली नाही तर आम्ही क्रांती करणारा निर्णय घेऊ, असा इशारा देखील आंधळकरांनी दिला आहे.
धनाजी सावंतही इच्छुक
दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनाजी सावंत हे देखील इच्छुक आहेत. नुकतीच त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध वाढताना दिसत आहे.
अर्चना पाटील यांना तिकिट
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीकडून हे तिकिट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटले आहे. त्यांच्याकडून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या निवडणूक लढवत आहेत. मात्र, यावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. धाराशिवची जागा राष्ट्रवादीला नको शिवसेनेला द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.