परभणी : पालम तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणा-या भोगाव येथील मारुती मंदिरात दर्शनासाठी येणा-या महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मराठा आंदोलकांकडून रोखण्यात आले.
यादरम्यान, आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करत जानकरांना विरोध दर्शवला.
मंगळवारी जानकर हे गंगाखेड, पालम शहरातील कार्यकर्त्यांची धावती भेट घेऊन भोगावकडे निघाले होते. यादरम्यान, पेठशिवणीच्या महादेव मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्यासोबत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, जिल्हा बँकेचे संचालक गणेशराव रोकडे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भैय्या सिरस्कार, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भोगावकडे वाहनांतून निघाल्यानंतर सुरुवातीला पदाधिका-यांच्या गाड्या, तर पाठीमागील वाहनातून जानकर येत होते.
सर्वांना मराठा आंदोलकांनी भोगाव फाट्यावरच रोखले. प्रारंभी पदाधिकारी वाहनातून खाली उतरून आंदोलकांना समजावून सांगत होते. परंतु, आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने एकाही पदाधिका-यांचे काहीच चालले नाही. घोषणाबाजी करून आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून जानकरांना विरोध दर्शवला. प्रचाराऐवजी आपण हनुमान मंदिरात दर्शन घेऊन परत जाणार असल्याचे पदाधिका-यांनी आंदोलकांना सांगितले. परंतु, आंदोलकांनी कोणाचेही ऐकले नाही. उलट कोणत्याही पक्षाच्या उमेदवारास गावात येऊ देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली.
जानकर १५ मिनिटे वाहनात थांबून
या सर्व घडामोडींदरम्यान महादेव जानकर याठिकाणी जवळपास १५ मिनिटे आपल्या वाहनात थांबून होते. परंतु, आंदोलक आपल्या भूमिकेवर अडून राहिल्याने कुणाचेच काही चालले नाही. शेवटी जानकर यांनी आपल्या पदाधिका-यांना मागे वळण्याचे सांगत ते स्वत:हून पदाधिका-यांसह माघारी परतले.