नवी दिल्ली : पतंजलीच्या वादग्रस्त जाहिरात प्रकरणात बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी या दोघांचा दुसरा माफीनामाही फेटाळला आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठाने पतंजलीचे वकील विपिन सांघी आणि मुकुल रोहतगी यांना सांगितले की, तुम्ही न्यायालयाच्या आदेशाचे जाणूनबुजून उल्लंघन केले आहे, त्यामुळे तुम्हाला माफी नाही मिळणार , तुम्ही कारवाईसाठी तयार राहा, असे न्यायालयाने म्हटले.
यापूर्वी २ एप्रिल रोजी याच खंडपीठात झालेल्या सुनावणीदरम्यान पतंजलीच्या वतीने माफीनामा सादर करण्यात आला होता. त्या दिवशीही खंडपीठाने पतंजलीला फटकारले होते आणि ही माफी केवळ दिखावा आहे, असे म्हटले होते. यानंतर न्यायालयाने १० एप्रिल रोजी प्रकरणाची सुनावणी करण्याचे सांगितले होते. ९ एप्रिल रोजी, सुनावणीच्या एक दिवस आधी, बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले. ज्यामध्ये पतंजलीने बिनशर्त माफी मागितली आणि या चुकीबद्दल खेद व्यक्त केला आणि असे पुन्हा होणार नाही अशी गाव्ही दिली होती, मात्र, न्यायालयाने हा माफीनामाही फेटाळून लावला आणि बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना कारवाईसाठी तयार राहण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार आहे.
आयएमएने पतंजलीविरोधात दाखल केली याचिका
दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने पतंजली विरोधात ही याचिका १७ ऑगस्ट २०२२ रोजी दाखल केली होती. या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पतंजलीने कोविड लसीकरण आणि अॅलोपॅथी विरोधात नकारात्मक प्रचार केला. यासोबतच पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी अनेक रोग बरे केल्याचा खोटा दावा केला होता, असा आराप आयएमएने या याचिकेव्दारे पतंजलीवर केला आहे.