लातूर : प्रतिनिधी
आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी म्हणजेच दि. १२ नोव्हेंबर रोजी शहरात उत्साहपुर्ण वातावरणात लक्ष्मीपुजन झाले. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. लक्ष्मीपुजनाची सर्वत्र रेलचेल होती. लक्ष्मीची पुजा, सनई, चौघड्यांचा निनांद आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपुर्ण शहरातील वातावरणात आनंद भरला होता.
लक्ष्मी ही समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक आहे. दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीची पुजा मनोभावे केली जाते. रविवारी लक्ष्मीची पूजा घरोघरी तसेच बाजारपेठेतील विविध व्यापा-यांनी मनोभावे केली. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल, स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखविण्यात आला. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटण्यात आले.
तसेच चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी करण्यात आली. व्यापारी वर्गात पूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. दिवाळीनिमित्त गेल्या आठ दिवसांपासून बाजार पेठेत दिवाळीसाठी आवश्यक जिन्नसाच्या खरेदीसाठी एकच गर्दी झाली होती. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत पाय ठेवायलाही जागा नव्हती इतकी गर्दी झाली होती. फराळाचे साहित्य, मिठाई, कपडे, सुगंधी तेल, उठणे, साबण, सौंदर्यप्रसादने आदी खरेदीची रेलचेल होती. रविवारी लक्ष्मीपुजनाची एकच धुम होती. सनई, चौघड्यांच्या निनांदात फटाक्यांच्या आतषबाजेने दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला.