23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeमहाराष्ट्रसोशल मीडियावर दिवाळीचा जल्लोष

सोशल मीडियावर दिवाळीचा जल्लोष

रिल्स, व्हिडिओ, संदेशांमुळे रंगत

पुणे – पणतीचा उजेड अंगणभर पडू दे…लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे…सौभाग्याचे दीप उजळती…शब्दांची सुमने फुलती…जेव्हा येते दीपावली! दिवाळीच्या निमित्ताने सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनोख्या रिल्स, व्हिडिओ आणि सामाजिक संदेशांद्वारे सोशल मीडियावरही दिवाळी रंगली आहे.

दिवाळी म्हटलं की लखलखणा-या दिव्यांचा प्रकाश, घरोघरी विद्युत रोषणाई, फराळाचा दरवळणारा सुगंध, अंगणात रांगोळी, फुलांची सजावट असे चित्र आपण नेहमीच पाहतो. त्यात आता सोशल मीडियावरही दिवाळी अत्यंत उत्साह व आनंदात साजरी केली जात आहे. विविध सोशल मीडिया व्यासपीठांवर दिवाळीच्या शुभेच्छा, रिल्स, व्हिडिओ आदी टाकले जात आहेत. दरम्यान, नोकरी व शिक्षणाकरिता आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे दिवाळीनिमित्त घरी जातानाचा आनंद व्­यक्त करत सध्या व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रॅम आणि फेसबुक स्टोरीज पोस्ट करत आहेत.

सगळीकडे दिवाळीमुळे गर्दी पाहायला मिळत आहे. तर बाजारपेठातील गर्दी, त्यात शहरातील विविध ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, खरेदी, फटाक्यांची आतषबाजी अशा विविध गोष्टींचे अगदी काही सेकंदांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर बाहेर गावी किंवा परदेशात असलेल्या व्यक्तींद्वारे व्हिडिओ कॉल आणि एकमेकांना सोशल मीडियाद्वारेच दिवाळीच्या गोड शुभेच्छा दिल्या जात आहेत.

प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश
सोशल मीडिया ही काळाची गरज बनली असून प्रत्येकजण मनोरंजनाचा साधन म्हणून यावर बराच वेळ घालवत असतात. हा केवळ मनोरंजनाचाच नाही तर, सामाजिक संदेश देण्याचा देखील एक महत्त्वाचा स्रोत म्हणून अलीकडे वापरला जात आहे. त्याच अनुषंगाने सोशल मीडियाचा वापर आता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्याकरिता होत असल्याचे दिसून येत आहे.

रिल्स, शॉर्ट व्हिडिओंच्या माध्यमातून पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश ही दिला जात आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतानाचे रिल्स, विविध प्रकारचे हॅशटॅग देखील सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

आनंदाची दिवाळी…

दिवाळीमध्ये दिवे, विद्युत रोषणाई, फुले, रांगोळी अशा अनेक वस्तू घेतल्या जातात. त्यात रस्त्यावर या गोष्टी विक्री करण्या-या किरकोळ विक्रेत्यांकडून दिवे, पणत्या, आकाशकंदील आदींची खरेदी करत त्यांची दिवाळी आनंदाची व्हावी, असा ही संदेश सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. ‘उठा उठा दिवाळी आली, यांची दिवाळीही आनंदाची करण्याची वेळ झाली’ असे अनोखे कॅप्शन देत छायाचित्र आणि व्हिडिओ टाकले जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR