लातूर : प्रतिनिधी
अज्ञात व्यक्ती अंगाला खाद्य तेल लावून मध्यरात्री नागरिकांच्या घरात घुसतो. महिलांचे कपडे धारधार शस्त्राने कापून काढतो आणि निघुन जातो, अशी अफवा गेल्या आठ दिवसांपासून लातूर शहराच्या पुर्वभागात जोरदारपणे पसरली. या अफवेचे लोण हळूहळू व्यापक होत चालले होते. दरम्यान पोलिसांनी याबाबत सखोल तपास करुन तीन टवाळखोरांना गजाआड केले आहे. शहरात कुठलीही टोळी कार्यरत नाही. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: महिलांनी घाबरु नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे.
काही तरुणांनी घरात घुसून महिलेची छेड काढल्याची घटना शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्या घटनेचा तपास करण्यात आला असून तीघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सूरु आहे. यासंदर्भाने केलेल्या चौकशीदरम्यान असे दिसून आले की, कोणत्याही प्रकारची टोळी बाहेरुन आलेली नाही. स्थानिक टवाळखोर तरुण आहेत. अफवा पसरविण्याकरीता मुद्दाम काही तरुणांनी हातात शस्त्र घेऊन तोंडाला रुमाल बांधून मध्यरात्री विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बाहेरुन कोणत्याही प्रकारची टोळी लातूर शहरात आलेली नाही. शहराच्या पुर्वभागामध्ये मोठ्याप्रमाणात पोलिसांची गस्त वाढविण्यात आलेली आहे. अधिक कुमक लावण्यात आलेली आहे, त्यामुळे नागरिकांनी विशेषत: महिलांनी घाबरु नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे.
शहराच्या पुर्वभागामध्ये विशेषत: गरुड चौक, महादेवनगर, एसओएस, मळवटी रोड आदी परिसरात बाहेरुन आलेली टोळी मध्यरात्री घरात घुसुन महिलांचा विनयभंग करीत आहेत. विशेषत: एक भितीदायक व्यक्ती संपुर्ण अंगाला खाद्य तेल लावून मध्यरात्री घरात घुसतो. धारधार शस्त्राने महिलांच्या अंगावरील कपडे कापून काढतो आणि निघून जातो, अशी अफवा गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे पोलीस सतर्क झाले होते. शिवाय त्या त्या भागातील काही तरुणांनी रात्रभर जागुन अशा प्रकारचा अपराध करणा-यास पकडण्याचा विढाच उचलला होता. ही अफवा हळूहळू शहराच्या इतर भागापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे पोलिसांनी मोठ्याप्रमाणात गस्त वाढवून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.