पुणे : शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यावसायाकडे पाहिले जाते. असे असताना आता हा व्यवसाय करणे अवघड झाले आहे. दूध दरात मोठी घसरण झाली आहे. ३४ रुपयापर्यंत गेलेले दर आता २८ रुपयावर आले आहेत. तर दुसरीकडे चा-याचे व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. दुधाळ जनावरे सांभाळणे शेतक-यांना आता अवघड जात आहे.
गेल्या तीन महिन्यात दूध दर प्रति लिटर पाच रुपयेने घसरले आहेत. दिवाळीला दूध दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी कडू होण्याची शक्यता आहे. सरकारी अध्यादेशाला दूध संघांनी केराची टोपलीत टाकून मनमानी कारभार चालू केला आहे. टप्प्याटप्प्याने दूध दरात मोठी घसरण होत चालली आहे. मे जून महिन्यात गायींच्या दूध दरात ३८ रुपयांचा उच्चांक नोंदवला होता. शासनाने अध्यादेश काढून कमीतकमी ३४ रुपये दरापेक्षा कमी दर देऊ नये, असे स्पष्ट केले होते. परंतु आता अध्यादेश काढल्यापासून दूध घरात घट होत आहे.
जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यात पाच रुपयांनी दूध दर कमी झाले. तर दिवाळी सणाच्या तोंडावरच मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारचे नियंत्रण नसल्यानेमुळे दूध संघांची मनमानी चालू आहे. दूध उत्पादक शेतक-यांना आथिर्क फटका सहन करावा लागत आहे.
दुधाचे दराला शासनाने हमीभाव जाहीर केल्यामुळे पशुपालन व्यवसाय वाढविण्याच्या तयारीत होते.
गेल्या वर्षी काही शेतक-यांनी दुधाळ जनावरे खरेदी केली. त्यासाठी जवळचे पैसे खर्च केलेतर काहींनी बँकेचे कर्ज घेऊन गायी, म्हशी खरेदी केल्या होत्या. मात्र, सध्या वाढलेले पशुखाद्याचे दर, चा-याचे दर व दूध दरात झालेलीकपात यामुळे दूध उत्पादक शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. त्यामुळे जनावरे विकताही येईना आणि ठेवताही येईना, अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे.