विनायक कुलकर्णी
पुणे : प्रतिनिधी
आगामी काळातील ‘पुणे शहराचे व्हिजन’या विषयावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणा-या महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराना निमंत्रित करण्यात आले पण ज्या-त्या पक्षाची भूमिका मांडण्याबरोबर उमेदवारांनी राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याची संधी सोडली नाही. निमित्त होते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमाचे.
महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि आघाडीचे वसंत मोरे हे उमेदवार वार्तालाप कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रत्येक उमेदवाराने शहरातील विविध प्रश्नांचा पाढा वाचला आणि आगामी काळात कोणते प्रश्न सोडविण्यावर भर देणार याबाबत भाष्य केले. हे मांडत असताना त्या त्या काळातील सरकारने प्रश्न सोडविण्यासाठी काय केले आणि काय नाही याबाबत भाष्य केले. पण हे करीत असताना त्याला टीकेची किनार असल्याने याला राजकीय वळण लागले आणि वार्तालापचे स्वरूप बदलले गेले.
पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना काहींनी समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी अन्य उमेदवारांनी अपयशाचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणी पुरवठा, आरोग्य, सुरक्षा, सरकार आणि राज्य शासनाच्या विविध योजना याबाबत सविस्तर ऊहापोह करण्यात आला. मात्र हे करीत असताना एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही.